कविता :: देव आणि दैव
कवयित्री
:: सौ. वंदना विजय धर्माधिकारी
देव दैवात वाद जाहला कुणी
जायचे पुढे
एकमात्रा अधिक म्हणोनी दैव
ठाकले पुढे
एक मात्रा स्वीकारुनिया देव
पाठीशी खडे
राहिले देव पाठीशी खडे
प्रत्येकाचे दैव वेगळे
कुणीकुणाचे कधी न जाणले
गतजन्मीचा ठेवा म्हणोनी
या जन्मी उघडे
राहिले देव पाठीशी खडे
दैवाला ना पराम्मुखता परांड़्मुखता
प्रारब्धाची असे विविधता
भोग भोगणे या जन्मातच
सटवीने पुजिले
राहिले देव पाठीशी खड़े
मंदिरातले सगुण ईश्वर
साठवले ते रूप मनोहर
आर्त होउनी आळवती स्वर
अणुरेणुत तो दडे
राहिले देव पाठीशी खड़े
कुणी न पाहिले भगवंताला
परी मनोमनी तोची पुजिला
अपयशाचे खापर आम्ही
दैवावरी फोडले
राहिले देव पाठीशी खड़े
पुर्नजन्मीच्या दैवासाठी
या दैवापुढे हात टेकती
देवापुढती हात जोडुनी
घालती त्या साकडे
राहिले देव पाठीशी खड़े
मात्रा असुनी न चले मात्रा
त्यांच्यापुढती मानव भित्रा
इलाज नसता या नियतीला
स्विकारती बापुडे
राहिले देव पाठीशी खड़े
दैवाचे साहूनी तडाखे
देवापुढती माथा टेके
देव नि दैवासवे अडकले
मनु मधे सापडे
राहिले दैवापाठी देव खड़े
वंदना धर्माधिकारी