22-04-2016
प्रभात – रूपगंध पुरवणी – लेखांक ५ - जागतिक
वसुंधरा दिवस
वसुंधरे, तुझ्याचसाठी
लेखिका
: सौ.वंदना विजय धर्माधिकारी
संतांसी जाई शरण
त्यासी म्हणती साधक
निसर्गसौंदर्याचे आम्ही सारे उपासक
ऋतु सहा पण तू सर्वांची पहिली पसंत
'वसुंधरेचा संत' म्हणोनी नाम तुझे 'वसंत'
निसर्गसौंदर्याचे आम्ही सारे उपासक
ऋतु सहा पण तू सर्वांची पहिली पसंत
'वसुंधरेचा संत' म्हणोनी नाम तुझे 'वसंत'
मी शब्दबद्ध केलेल्या वसंतऋतू कवितेतल्या संताला प्रथम वंदन करून जागतिक
वसुंधरा दिनावर लेख लिहायला घेते. निसर्गासह निसर्गाच्या सान्निध्यात मनसोक्त
डुंबणार्याना निखळ आनंद देणारा वसुंधरेचा
हा संत. संत म्हणजे कोण? त्याचे काम काय असते? असा प्रश्न डोकावला मनात, तेच काम
हा वसंत करतो का? ‘होय’. हेच उत्तर. चांगल्यांचे रक्षण, सुधारणा, वृद्धी, उत्पन्न,
यासाठी जो सतत प्रयत्न करतो तोच संतपदास जातो. आहे त्याची जपणूक, सत सत
प्रवृत्तींची पेरणी करून खतपाणी घालून सुंदर वृक्ष वाढवायचा. हेच तर वसंताचे
कर्तव्य आणि तो तर कर्तव्यपालनदक्ष. नवीन पालवी डोकावते एखाद्या छोट्या मोठ्या
वृक्षावर ती वसंतातच. नवपालवीचा नाजुकपणा, लुसलुशीत स्पर्श, त्यावरील बारीकबारीक
रेषा, किंचित पारदर्शकता असे मनमोहक सौंदर्य
मनाला भुरळ घालतेच. नवपल्लवी
बाकीच्या पानांपेक्षा मोहक तर असतेच, पण वाऱ्याबरोबर तिचं नृत्य एखाद्या अवखळ
बालीकेसारखे भावते. त्या बालिकेच्या डुलातील लोलक कधी चमकेल, सांगणे अवघड नव्हे
कठीण. तसेच या पानाची तुकतुकी कधी चमकून आपल्याला खेचेल हेही ओळखणे अनाकलनीय असते.
अशाच पानावर अलगद विसावलेला तो सूर्यकिरण बघताक्षणी चमकून टाकतो कोवळ्या पानाला
आणि आपल्या संवेदनशील मनाला. अतिशय
चपळाईने पान डोलताना लक्षात येते ती वसंताची किमया. त्याने घडवून आणलेला पृथीच्या
परिसराचा हिरवागार तजेलदार कायापालट. आंब्यालाही मोहर आला, मोगर्याला कळी. दुःख सोडून फुलून आली
हास्य चंपाकळी.
वसुंधरा दिन एकच दिवस कसा असू शकेल? ती वसुंधरा तर सतत, क्षणाचीही उसंत न घेता
स्वत:भोवती फिरते, आणि त्या सूर्याला प्रदक्षिणा घालीत युगानुयुगे धावत आहे. सगळेच
दिवस तिचे, पण किमान एक दिवसतरी त्याच वसुंधरेवर बागडणाऱ्या सर्वांनी साजरा
करायलाच हवा वसुंधरेचा उत्सव. त्यानिमित्ताने जाणून घ्यावे तिला, कशी आहे, आधी कशी
होती, बदलली का थोडी, का बरं असं बदलावं
तिनं, कशामुळे हे झालं. माणसामुळे? कि निसर्गानेच बदलवले तिला, या धरतीला. हा दिवस
आहे तिच्याशी आपण कसे वागतो याचे आत्मपरीक्षणाचा, काही बदल करता आला तर त्याचा संकल्प
सोडायचा. निसर्गाने आपल्याला खूप काही
दिले, तो देतच राहणार. देणे, दातृत्व हा तर निसर्ग नियम आहे. आपण काय करतो? जपून
ठेवतो ती ठेव? आपल्याच पुढच्या पिढ्यांसाठी? शांत डोक्याने विचार केला, तर आतला
आवाजच सांगेल काही तरी चुकतं आहे नक्कीच. त्याच चुकांची जाणीव सर्वांना व्हावी
म्हणून करायचा वसुंधरा दिवस साजरा. चार गोष्टी शिकायच्या आणि वाचावायचे नैसर्गिक
मूल्यांना, संपत्तीला.
अमेरिकेत
१९६९ साली राष्ट्रीय पर्यावरण संरक्षणाचा मुद्दा सरकारने राजकीय
कार्यक्रमपत्रिकेवर प्रथम घेतला. निसर्ग संपत्तीचे रक्षणासाठी देशभर विविध प्रकारे
कार्यक्रम आयोजित करायचे ठरले. परिणामी २२
एप्रिल १९७० रोजी निरोगी, स्वच्छ आणि शास्वत पर्यावरणासाठी एका किनार्यापासून
दुसर्या किनार्यापर्यंत, रस्त्यांवरून, बागांमधून लोकांनी फेऱ्या काढल्या, फलक
धरले, घोषणा दिल्या. विविध सभागृहात मार्गदर्शनपर व्याख्याने दिली. निसर्ग
श्रीमंतीची नासाडी करणाऱ्या गोष्टींचा कडक निषेध करण्यात आला. अनेकांचा उत्स्फूर्त
प्रतिसाद हीच ताकद ठरली. कारखाने, उर्जा प्रकल्प, तेलगळती, विनाप्रक्रिया विघातक व
विषारी पदार्थ तसेच फेकून देणे, कीटकनाशकांचा वाढता वापर, जंगलतोड, मोकळ्या जागांची हाव,
सृष्टीसंपत्तीचा नाश, पाणतळ्यांची अवहेलना, त्यात नको ते मिसळणे, अशा एक ना अनेक
निसर्गद्वेष्ट्या कृतीना पायबंद घालण्याचा निश्चय करूनच नागरिक रस्त्यावर आले
होते. “Save earth - वसुंधरा वाचवा.” तोच २२ एप्रिल १९७० चा दिवस, ज्या दिवशी
अमेरिकेचे सिनेटर गेलॉर्ड नेल्सन यांच्या नेतृत्वात ‘पहिला जागतिक वसुंधरा दिवस’
साजरा केला गेला. २००९ साली संयुक्त राष्ट्रसंघाने जागतिक वसुंधरा दिन साजरा
करण्याचे अधिकृतरीत्या जाहीर केले, तेंव्हापासून उत्सवाचे स्वरूप सर्वव्यापक झाले.
गरीब श्रीमंत, गावकरी, शेतकरी, उद्योजक, राजकारणी सर्वांनी दिलेल्या पाठींब्याने
एकमताने “युनायटेड स्टेट्स एन्व्हायर्नमेंटल प्रोटेक्शन एजन्सी” ची स्थापना झाली.
त्यापाठोपाठ स्वच्छ हवापाणी, जंगल रक्षण, नामशेष होऊ पाहणाऱ्या प्रजातींचे रक्षण
यासाठी विशेष कायदे केले गेले. आवश्यकतेनुसार त्यात बदल, भर घातली गेली. याचा अर्थ
योग्य प्रकारे कायदा पालन होतेच असे नाही.
वसुंधरेची
काळजी घेण्यासाठी ‘अर्थ डे नेटवर्क – EDN” ही संस्था जगभर
पर्यावरणविषयक जागृतीला चालना देते, एक चळवळ त्यांनी उभी केलेली आहे.
आंतरराष्ट्रीय किमान २२ हजार संघटना यांच्या सभासद असून एकमेकांशी संपर्कात राहून
कार्य करीत आहेत. पृथ्वी, पर्यावरण,समस्या, विचार, योजना, कृती असे सर्वांगाने
लक्ष घातले जाते. २०१५ साली ‘अर्थ डे नेटवर्क’ ने सगळ्यांना आवाहन केले ते ‘आता
नेतृत्वाची वेळ आपलीच’ या वाक्याने. कुठल्या देशाने काय केले, यावर चर्चा आणि
उहापोह होईलच वसुंधरा दिनी. त्यासाठी प्रत्येक व्यक्तीने काय केले पाहिजे हा
प्रश्न अनुत्तरीत राहतो. आपणच काहीतरी केले पाहिजे - हाच निरोप आहे सगळ्यांना.
पृथ्वी स्वत:भोवती फिरत फिरत सूर्याभोवती फिरते.
स्वत:भोवतीची एक गिरकी म्हणजे एक दिवस. संपूर्ण सूर्य प्रदक्षिणा म्हणजे ३६५ दिवस-एक
वर्ष. पृथ्वी सूर्याभोवती फिरताना तिचा अक्ष काटकोनात नसतो, तर २३.५ अंशाने तो
कललेला आहे. त्यामुळे सूर्यकिरण पृथ्वीवर पडताना कमीअधिक प्रमाणात तिरपे पडतात.
त्याने सगळेच दिवस सगळ्या ठिकाणी सारखे नसतात. यालाच ऋतू बदल म्हणतात. भारताकडे
ऋतूंची श्रीमंती आहे. एकुणात सहा ऋतू आपण मानतो. आपल्या देशात शिशिर, वसंत,
ग्रीष्म, वर्षा, शरद आणि हेमंत असे सहा
ऋतू आहेत. भारतभूला नद्या नाले, पर्वत शिखरे, डोंगर दर्या, समुद्रकिनारा,
उंचसखोलता असे मुबलक वैविध्य आहे. तसेच विस्तृतपणे पसरलेला भूभाग वैविध्यापूर्ण
हवामानाने सुंदर सुंदर छटा सोडीत जातो. जे चित्र एका दिवशी काश्मीर मध्ये दिसेल,
तसेच खाली कन्याकुमारीला नसते. हेच वैविध्य सांभाळणे, पृथ्वीचा समतोल राखणे ही
जबाबदारी एक जबाबदार नागरिक या नात्याने प्रत्येक व्यक्तीची आहे. निसर्ग दोन्ही
हातांनी अगदी मुक्तपणे मनापासून पृथ्वीवरील रहिवाश्यांना देत आलेला आहे, देत आहे,
आणि देईलही. त्याचे सुरवातीपासून जे चालत आलेले आहे, त्यात खंड नाही. बदल केला,
चुका केल्या, त्रास दिला, अजूनही देत आहे तो माणूस. इतर ग्रहांवर मानवसृष्टी आहे किंवा नाही
हे माहित नाही. पृथ्वीवरील मानव जमांत मात्र आपल्याच गुर्मीत निसर्गाची धूळधाण करू
लागली. हेच संहारचित्र कलियुगातील काळे कुट्ट चित्र आहे. कोण नासाडी करते या
निसर्ग संपत्तीची? मी, तुम्ही आणि तो. याला तमाम सर्व मानवजात जबाबदार आहे.
माणसाने इतर पशुपक्ष्यांना आपल्या कह्यात घेतले, गरीब बिचारे एकेक करीत संपत
चालले. अनेक पशु पक्षी कीटक यांच्या अनेक जातीजमाती संपून गेल्यात. असे जर राहिले
तर मनुष्य जमातीच्या अस्तित्वाचे ग्वाही कोणीही देऊ शकणार नाही. हे कटू सत्य
सगळ्यांना स्वीकारावेच लागेल.
पाणी, हवा, प्राणवायू यांचे शिवाय कोणीच जगू
शकणार नाही. निर्जीव सजीव यांना संजीवनी देणाऱ्या या निसर्ग संपत्तीची वाताहत
होताना सर्वसामान्य माणूस तटस्थ भूमिका घेतो. पाण्याच्या अभावी लोकांचे तोंडचे पाणी
पाळलेले आपण सध्या रोजच तिन्हीत्रिकाळ बघत आहोत. माणसाला, निदान भारतीय जनतेला
जलसाक्षर केले पाहिजे. त्याकडे दुर्लक्ष होताना दिसते. देशभरात सुमारे २००० नद्या
आहेत. काहींचे प्रवाह झाकले गेले, काहींचे वळविले, पात्र संकुचित केले,
मोठ्मोठ्ठले टॉवर्स उभारले, तर काहींची वाळू पळवून नेली.ज्यांना ते नाही जमले
त्यांनी कारखान्यातील दुषितरसायन मिश्रित पाणीच नदीत सोडले. तेच पाणी जमिनीत
मुरते, जमिनीचा कस गेलाच. प्लास्टिक, कचरा, कुजलेला भाजीपाला, निर्माल्य हे तर जणू
नदीतच टाकायचं असतं. म्हणजे एकुणात काय, तर नदी खराब होण्यासाठी प्रत्येकजण आपला
सहभाग नोंदवीत आहे. त्यांनी नदी स्वच्छ करण्याचे कामी सुद्धा हातभार लावावा. नदी
मिळते समुद्राला. समुद्रातील सगळे जलचर जलसमाधी घेऊन समुद्रकिनारी लाखोंच्या
संख्येने मृतावस्थेत आढळतात. अशा किती तरी जाती नष्ट झालेल्या आहेत. केवळ जलचर
नाहीत, तर जंगल तोडीमुळे वन्य प्राण्यांना जगणे अशक्य होते. सस्तन प्राणी,
सरपटणारे, जलचर, पक्षी, यांची संख्या कमी होत चालली. माणसाची संख्या वाढताना
दिसते. नुसती संख्या, पण निसर्गाची जाण बाळगली जात नाही हीच शोकांतिका आहे.
या वसुंधरा दिनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा त्या वसुंधरेला बघा, तिची काळजी
घ्या, मिळालेला निसर्गरम्य ठेवा, निसर्गाची जपणूक करा, झाडे लावा, झाडे जगवा, पाणी
जपून वापरा. टाकाऊ पण न विरघळणार्या वस्तूंचा पुनर्वापर करा. प्लास्टिक, थर्मोकोल,
दुषित रसायने व वायू वापरणे बंद करा
किमान कमीतकमी वापरा. वस्तूंचे पॅकिंग वेगळ्या पद्धतीने करा, जेणेकरून अविघटीत
कचरा वाढणार नाही. विजेची बचत करा, सौर उर्जा वापर वाढवा. प्रदूषण कमी करण्यासाठी
कमीतकमी वाहनांचा वापर करा. सुखी, आरोग्य संपन्न, समृद्ध जीवन स्वत:ला आणि आपल्या
पुढील अनेक पिढ्यांना द्यायचे असेल तर, पर्यावरण जपणूक पाहिजे. स्वच्छ, शुद्ध,
समृद्ध वसुंधरा जिवंत ठेवणे हे मानवाचे प्रथम कर्तव्य आहे. कर्तव्यदक्ष राहा, निसर्गाशी कृतघ्नपणे
वागू नका. खोट्या
सुखसमृद्धीच्या हव्यासापोटी लाभलेले ऐश्वर्य पायदळी तुडवू नका.
फुकट मिळालेल्या संपत्तीची योग्य देखभाल जर
केली नाही तर तो निसर्गावर केलेला अन्याय असेल. अन्याय असह्य झाला तर हा निसर्ग
कोपतो तो आपले रौद्र रूप अधून मधून दाखवीत
असतोच. मानवाने किती जरी बढाया मारल्या तरी आपल्यापेक्षा निसर्ग अधिक बलवान, अधिक
लहरी आहे याची जाणीव माणसाला आहे. नुसते ज्ञात असून काय उपयोग, त्यानुसार कृती करताना आपली बुद्धी गहाण टाकूनच तो वागतो.
त्याने निसर्गाची नासधूस तर राजरोस सुरु
केलीच आहे. तीच थांबवली पाहिजे. पृथ्वी आपल्यासाठी थांबलेली आपणास माहित आहे?
कदाचित माहित नसेल अनेकांना.
होय, पृथ्वीने आपल्यासाठी, तिच्यावर असलेल्या सजीव प्राणीमात्रांसाठी
खूप मोठा त्याग केलेला आहे. असेल ती कवी कल्पना, पण त्यापासून खूप काही शिकायचे ते
याच दिवशी, वसुंधरा दिनाचे दिवशी. कुसुमाग्रज म्हणजे श्री.विष्णू वामन शिरवाडकर यांची एक कविता आहे, ‘पृथ्वीचे
प्रेमगीत’. पृथ्वीचे आणि सूर्याचे प्रेमाचे नाते आहे. पहिल्या कडव्यात वसुंधरा
प्रियकर सूर्याला म्हणते :
युगामागुनी चालली रे युगे
ही, करावी किती भास्करा वंचना
किती
काळ कक्षेत धावू तुझ्या मी, कितीदा करू प्रीतीची याचना
तीच विरहिणी वसुंधरा खूप बोलते सूर्याशी, आणि
एका क्षणी तिला आठवतात तिच्या अंगा खांद्यावर खेळणारे सारे आपण. मिलनास आतुर
असलेली ती पृथ्वी शेवटी म्हणते, ‘नको मिलन, विरहच बरा.’
ती म्हणते सूर्याला : परी दिव्य ते तेज पाहून पुजून, घेऊ गळ्याशी कसे काजवे
नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा, तुझी दूरता त्याहुनी साहवे.
वंदना धर्माधिकारी
M: 9890623915